पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी आढळून येणारी बेवारस वाहने अतिक्रमण समजून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जप्त करण्यात येणार आहेत. ती वाहने परत मिळवण्यासाठी यापुढे दंड भरावा लागणार आहे. दुचाकींसाठी ५ हजार रुपये, तीन चाकींसाठी १५ हजार रुपये आणि चारचाकी व मोठ्या वाहनांसाठी २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध रस्ते, उड्डाणपूल तसेच मोकळ्या जागांवर बेकायदेशीरपणे वाहने सोडून दिलेली आढळून येतात. ती वाहने बराच काळ तशीच पडून राहतात, असा अनुभव आहे. आतापर्यंत या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, सुरक्षिततेसह स्वच्छतेचा मुद्दा लक्षात घेऊन अशा वाहनांसदर्भात धोरण निश्चित करण्याच्या सूचना राज्य शासनाने महापालिकांना दिल्या होत्या. त्यानुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू केली होती. टाळेबंदीमुळे ती कारवाई थंडावली होती. जप्त केलेल्या वाहनांना ठेवण्यासाठी जागा नसणे, त्यांची देखभाल करणे, विल्हेवाट लावणे यासारखे प्रश्नही निर्माण होऊ लागले. या संदर्भात ठोस धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेत महापालिकेने स्थायी समितीसमोर या बाबतचा प्रस्ताव बुधवारी मांडला होता, त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, अतिक्रमण कारवाईच्या धर्तीवर रस्त्यांवरील बेवारस वाहने जप्त करण्यात येणार असून ती सोडवून घ्यायची असल्यास दंड भरावा लागणार आहे. हे काम खासगी ठेकेदारांना देण्यात आले आहे. अशी वाहने ठेवण्यासाठी प्राधिकरणाची मोशी खाणीलगतची एक हेक्टर एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.























Join Our Whatsapp Group