पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पातील बाजारपेठीतील दुकाने, ग्राहक यांच्याकडून अटी – शर्तीचे उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. फेस मास्कचा वापर केला जात नाही . सम – विषम तारखेच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे पिंपरी बाजारपेठ गुरुवार (दि.२५) पर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात आली होती. मात्र यात आता वाढ करण्यात आली असून रविवार दि.२८ जून पर्यंत सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. पिंपरी कॅम्प परिसरातील मुख्य बाजारपेठ, शगुन चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक या परिसरातील बाजारपेठ उद्या शुक्रवार दि.२६ पासून रविवार दि.२८ जून पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. असा आदेश महापालिका ‘ग‘ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांनी काढला आहे.
सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, सम – विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास महापालिकेने परवानगी दिली होती. मात्र आदेशाचे वारंवार उल्लंघन होत होते. दरम्यान पिंपरी कॅम्प परिसरात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने महापालिकेच्या वतीने दि.२८ जूनपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.























Join Our Whatsapp Group