पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असताना देखील एका महाभागाने पिंपरीत जेवण आणि मद्यपार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी पोलीस पार्टीच्या स्थळी दाखल झाले असता त्यातील एका महाभागाने मद्यधुंद अवस्थेत ‘मी पत्रकार आहे.. नगरसेवक आहे.. गाववाला आहे.. तुमची नोकरीच घालवतो.. अशा भाषेत पोलिसांसोबत हुज्जत घातली. याप्रकरणी पोलिसांशी हुज्जज घालणाऱ्या मद्यपीसह २० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पत्राशेड झोपडपट्टी, पिंपरी येथे रविवारी (दि.१२) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
अगर अशोक कापसे (वय.४२, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर, पिंपरी) याच्यासह १५ ते २० अज्ञात इसमा विरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कापसे आणि इतर १५ ते २० जण पिंपरी येथील अय्यपा मंदिरासमोरील पत्राशेडमध्ये बेकायदेशीरपणे एकत्र येऊन जेवण आणि दारुची पार्टी करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या पोलीस शिपाई खोडदे यांनी जमावाला जाब विचारला. त्यावर आरोपी कापसे याच्यासह जमावाने खोडदे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच ‘मी पत्रकार आहे, नगरसेवक आहे, गाववाला आहे’ तुमची नोकरीच घालवतो’ अशी अरेरावीची भाषा करून गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांशी हुज्जज घालणाऱ्या मद्यपीसह २० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.























Join Our Whatsapp Group