पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात १४ जुलैपासून लागू करण्यात आलेला दहा दिवसांचा ‘लॉकडाउन’ आज उठला आहे. उद्यापासून (शुक्रवार दि.२४) शहरातील ‘कंटेनमेंट झोन’ वगळून सर्व दुकाने ९ ते ५ या वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने देखील खुली राहणार आहेत. याबाबतची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केली आहे.
राज्य सरकारने १ जुलै रोजी ठरवून दिलेल्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड शहरात अनलॉक-२ पद्धतीनेच त्यांची अंमलबजावणी होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात १४ जुलै ते २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आज रात्री त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून ‘अनलॉक’ असणार आहे. दरम्यान आज प्रतिबंधक उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने पिंपरीतील भीमनगर आणि पिंपरी गावठाणचा भाग तसेच थेरगावमधील गणेशनगरचा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे. आज दि.२३ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून राहणार आहे.
■ उद्यापासून हे सुरू होणार
▪सर्व बाजारपेठेतील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहणार
▪क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने व्यायामासाठी सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली राहणार
▪पीएमपीएमलच्या बसने सर्वांना प्रवास करता येणार
▪औद्योगिक आस्थापना १०० टक्के क्षमतेने सुरु
▪खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान विषयक ५० टक्के मनुष्यबळासह सुरु, शक्य असेल तोपर्यंत वर्क फ्रॉम होम
▪सरकारच्या आदेशानुसार केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सुरु राहणार
■ हे बंद राहणार
▪शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था
▪हॉस्टेल रेस्टारंट, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, बार, सभागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क
▪सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजने, सांस्कृतीक, शैक्षणिक उपक्रम, सभा, संमेलने
▪सर्व धार्मिक स्थळे























Join Our Whatsapp Group