पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्ण शहरात वाढत असताना महापालिकेच्या वतीने कोरोना रुग्णांचे आरटीपीसीआर व अँटीजेन हे चाचणीचे अहवाल ९ ते १० दिवसांनी मिळत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून बाधित रूग्णांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल त्वरित मिळावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन देण्यात आले असून कोरोनाचे अहवाल रूग्णांना २ दिवसांत न दिल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी अंकुश तापकिर, मयुर हजारे, गणेश उज्जेनकर, जय सकट, काशीनाथ जाधव, प्रदिप गायकवाड आदी उपस्थित होते.
मनसेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रुग्ण संख्या शहरात वाढत असताना महापालिकेच्या वतीने कोरोना रुग्णांचे आरटीपीसीआर व अँटीजेन हे चाचणीचे अहवाल ९ ते १० दिवसांनी मिळत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून बाधित रूग्णांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.
अहवालास होत असलेल्या विलंबामुळे शहरात रुग्ण देखील दगावत आहेत. हे चाचणी अहवाल हॉस्पिटलला वेळेत मिळत नाही. त्यामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी वेळ लागतो. अशा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. यामध्ये नुकतीच एक घटना घडली आहे. रुपीनगर मधील एका व्यक्तीची आरटीपीसीआर ही चाचणी अहवाल उशीरा आला त्यामुळे ही व्यक्ती मयत झाली.
तरी याची गंभीर दखल घेत कोरोना चाचणी अहवाल दोन दिवसात मिळावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.