पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने मागील ३ वर्षात राबविलेल्या निविदांवर ११ टक्के पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD म्हणून दिलेले एफडीआर तपासण्याची मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
११ टक्के पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून महापालिकेस दिलेले अनेक एफडीआर (फिक्स डिपॉझिट रिसीट) खोटे की खरे याबाबत खात्री महापालिकेकडे नाही. खोटे व बोगस एफडीआर बनवून देणारी टोळी शहरात कार्यरत असून असे अनेक बोगस एफडीआर ठेकेदारांनी महापालिकेस दिलेले आहेत.
या प्रकरणात मोठे रॅकेट असून ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याने या प्रकरणाची वाच्चता झाली नाही. महापालिका ठेकेदार काम मिळविण्यासाठी कमी दराने निविदा भरतात. हजारो कामासाठी महापालिका टेंडर मागवीत असते या कामासाठी निविदांमध्ये स्पर्धा होऊन २०, २५, ३०, ३२ टक्के कमी दराने निविदा ठेकेदार भरतात व काम मिळवतात.
काम मिळाल्यानंतर PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) म्हणून मनपास एफडीआर (फिक्स डिपॉझिट रिसीट) देणे बंधनकारक असल्याने मोठ्या रक्कमा बँकेकडे ठेऊन ठेव पावती अथवा डीडी स्वरूपात एफडीआर मनपाकडे जमा करावा लागतो. जमा केलेला एफडीआर खोटा की खरा याची खात्री अथवा तपासणी महापालिका करीत नाही.
नेमका याचाच फायदा घेऊन बनावट एफडीआर तयार करून देणारी टोळी सक्रीय झाली व ठेकेदार असे बनावट एफडीआर मनपाकडे जमा करीत असल्याने या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर महापालिकेची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा असल्याची बाब चौकशी नंतर उघडकी येईल अशी स्पष्टोक्ती आमदार बनसोडे यांनी दिली आहे.



















Join Our Whatsapp Group