पिंपरी (Pclive7.com):- कोविड विषाणूची लागण नसताना देखील मयत रूग्णाचा कोविडने मृत्यु झाला असा बनावट रिपोर्ट देऊन मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना पैशाचा तकादा लावणाऱ्या ताथवडे येथील पल्स हॉस्पिटल वर कायदेशीर कारवाई करावी अशी मगणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
यासंदर्भात युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, माजी सैनिक मयत सुरेश हनुमंत महापदी यांचा शनिवार दि.१९ सप्टेंबर २०२० रोजी जिजामाता हॉस्पिटल पिंपरी या ठिकाणी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांना ताथवडे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
परंतु पल्स हॉस्पिटलने योग्य उपचार न केल्याने दि.२६ सप्टेंबर रोजी माजी सैनिक सुरेश हनुमंत महापदी (रा. साई वैष्णवी पार्क तापकिरनगर) यांचा मृत्यू झाला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी लाखो रूपयांची मागणी पल्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून करण्यात आली होती. अखेर ३० हजार रूपयांची तडजोड करून मृतदेह ताब्यात दिला.
संपूर्ण वैद्यकीय बिल देऊन देखील पुन्हा पल्स हॉस्पिटलचे व्यवस्थापक मयुर हे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना पुन्हा हजारो रूपयांची मागणी करित आहेत. माजी सैनिकाच्या मृत्यू नंतर अशा प्रकारे त्यांच्या कुटूंबाला नाहक त्रास देणे योग्य नाही. तरी सदर प्रकरणी पूर्णपणे चौकशी करून पल्स रूग्णालय यांच्यावर कायमस्वरूपी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.
दरम्यान याबाबतचे सर्व आरोप पल्स हॉस्पिटलने फेटाळले आहेत. असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.