पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील विकास कामे ठप्प झाल्याने तसेच पावसाने शहराला सतत झोडपल्याने कुदळवाडी परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या प्रभागाचे नगरसदस्य व माजी महापौर राहुल जाधव यांनी या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व अधिकार्यांसह या भागाचा पाहणी दौरा केला असून कोणतेही कारण न देता या रस्त्याची कामे तातडीने हाती घ्यावीत असे आदेश दिले आहेत.
प्रभाग क्रमांक 2 मधील कुदळवाडी – पवारवस्ती औद्योगिक वसाहत परिसरातील रस्त्यांची खूपच वाताहत झाली होती. या परिसरातून पायी चालणेही अवघड बनले होते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने इतर सर्व विकास कामे थांबवून केवळ कोरोनावरील उपचारासाठी निधी खर्च करावयाच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची शहरातील सर्वच विकास कामे ठप्प झाली होती. मात्र कुदळवाडी परिसरात पाहणी दौरा केल्यानंतर या परिसरातील सर्वच रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करणार अशी माहिती नगरसेवक राहुल जाधव यांनी बोलताना दिली.
कुदळवाडी-पवारवस्ती मधील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचे कारखाने आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या धुव्वाधार पावसामुळे येथील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याच्या या समस्येला कारखानदारांना व नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील व्यावसायिकांनी नगरसेवक राहुल जाधव यांच्याकडे रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. राहुल जाधव यांनी यासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकार्यांसमवेत या भागाचा पाहणी दौरा केला व लवकरात लवकर या भागातील सर्वच्या सर्व रस्ते पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत.
यावेळी बोलताना राहुल जाधव यांनी म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने या भागातील रस्ते विकाससाठी निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेची विकास कामे बंद होती.
तसेच बरेचसे मजूर आपापल्या गावी परत गेले असल्यामुळे मनुष्यबळाअभावी रस्त्यांच्या कामासाठी वेळ लागला आहे. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून लवकरच या रस्त्यांची कामे पूर्ण होतील अशी माहिती राहूल जाधव यांनी दिली. यावेळी महापालिकेचे अधिकारी तसेच अनेक व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group