पिंपरी (Pclive7.com):- थेरगावातील पदमजी पेपर मिलमध्ये नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी न घेता कोळशापासून वीज व वाफ तयार केली जाते. येथे प्रदूषण होऊ नये याची दक्षता घेतली जात नाही. असे असताना काहीजण कंपनीची बाजू घेतात. म्हणजे कंपनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे काहीतरी साटेलोटे दिसत आहे. कंपनी प्रशासनाला हाताशी धरून या विषयाला वेगळे वळण देण्याचे काम काहीजण करत आहेत. त्यांना नागरिकांचे आरोग्य, प्रदूषण याचे काहीही देणेघेणे नाही. राजकीय विरोधापोटी या प्रकरणाला वेगळे वळण देवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालला आहे. हे अत्यंत चुकीचे असून असे कोणी करू नये, असे शिवसेना उपशहर प्रमुख सोमनाथ गुजर यांनी म्हटले आहे. तसेच कंपनी बंद करण्याचा कोणाचा अट्टाहास नाही. परंतु, व्यवसाय करत असताना नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणाला अधिकार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.
थेरगावातील पदमजी पेपर मिलचा बॉयलर प्लान्ट आहे. त्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. त्याची धूळ हवेत उडते. प्रदूषण होत आहे. ती धूळ आजूबाजूच्या घरांपर्यंत जात आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. नागरिकांनी खासदार आप्पा बारणे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे खासदार बारणे यांनी कंपनीला खबरदारी घेण्याबाबत पत्रव्यवहार केला होता परंतु, कंपनीने त्याची खबरदारी घेतली नाही. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ‘एमपीबीसी’कडे खासदार बारणे यांनी तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांकडून राजकीय विरोधापोटी या प्रकरणाला वेगळे वळण देवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालला आहे. मुळामध्ये आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना धुळी पासून खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. नागरिकांच्या आरोग्या संबंधित विषय असताना माजी नगरसेवक व त्यांच्या पत्नी नगरसेविकेने त्याकडे डुंकूनही पाहिले नाही. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही आरोप करणाऱ्यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यांनतर नागरिकांनी खासदार बारणे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर बारणे यांनी कंपनीकडे तक्रार केली. त्यानंतरही कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न असल्याने पर्यावरण मंत्री आणि ‘एमपीबीसी’कडे तक्रार केली.
तक्रार केल्यानंतर कंपनी बंद पाडतात अशी आवई उठवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मुळात कामगारांच्या जीवाशी पण कंपनी खेळत आहे. कामगारांच्याही आरोग्याला धोका आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका आहे.
नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. कमी पैशांत कोळशापासून कंपनी वीज निर्मिती करत आहे. बाहेरून वीज खरेदी करण्यास जास्त पैशे लागतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी न घेता कोळशापासून वीज निर्मिती केली जात आहे. प्रदूषण होऊ नये याची दक्षता घेतली नाही. असे असताना कंपनीची बाजू घेतात. म्हणजे कंपनी आणि माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्त्यांचे काहीतरी साटेलोटे दिसत आहे. कंपनी प्रशासनाला हाताशी धरून या विषयाला वेगळे वळण देण्याचे काम करत आहेत. त्यांना नागरिकांचे आरोग्य, प्रदूषण याचे काही देणेघेणे नाही.
जानेवारी महिन्यात ३०० कामगारांची भरती करणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कंपनीत कायस्वरूपी ३८० च्या जवळपास कामगार असुन ठेकेदारी पद्धतीने १५० च्या जवळपास कामगार आहेत. कायम कामगारांची भरती अनेक वर्षे केली नाही. असे असताना ३०० कामगारांची भरती करणार हे कोणाच्या सुपीक डोक्यातून आले हे समजत नाही. यापूर्वी देखील प्रदूषण करत असल्याने पदमजी पेपर मिलवर कारवाई केली होती. पवना नदी पत्रात रसायनमिश्रित पाणी सोडत होते. त्याविरोधात खासदार बारणे यांनी नगरसेवक असताना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या अनुषंगाने २० वर्षांपूर्वी पदमजी पेपर मिलने पाणी शुद्ध करण्याचा प्लांट बसविला. या पुढे कोणतेही प्रदुषण करणार नसल्याचे शपथपत्र कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यामुळे पवना नदीचे प्रदूषण टळले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेकवेळा कंपनीला नोटीस बजावली आहे.
थेरगाव, चिंचवड या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेले आहे. कंपनीने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. कंपनी बंद करण्याचा कोणाचा अट्टहास नाही.
परंतु, व्यवसाय करत असताना नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. केंद्र, राज्य सरकार पर्यावरणाचा नाश करणाऱ्यांना थारा देत नाही. जो कोणी पर्यावरण विरोधी काम करेल, पर्यावरणाचा ऱ्हास करेल. त्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. कंपनी जगली पाहिजे. पण, व्यवसाय करत असताना पृथ्वीवरील माणसे जगविण्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ नये असे सोमनाथ गुजर यांनी म्हटले आहे.