पिंपरी (Pclive7.com):- वर्षभरात होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने ‘घराघरात राष्ट्रवादी’ हा नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला युवक कार्यकारणीचे प्रमुख उद्दिष्ट संघटन बांधणी आणि बळकटीकरण करण्याचे होते. सदर उद्धिष्ट अत्यंत कमी वेळात सक्रियपणे पूर्ण करण्यात आले. आजपर्यंत युवक कार्यकारणीमध्ये मोठ्या संख्येने सक्रीय पदाधिकारी आहेत.
शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे मुख्य उद्धिष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार आणि सध्या महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष भाजपच्या भोंगळ कारभाराने व भ्रष्टाचाराने मोडकळीस आणलेल्या सार्वजनिक सेवांविषयी जनजागृती करण्यासाठी, प्रभागनिहाय घरा घरात राष्ट्रवादी मोहिमेचा आराखडा तयार करणे होते. याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आजपर्यंत केलेल्या आणि करत असलेल्या विकास कामांविषयीची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचेसुद्धा उद्धिष्ट ठेवण्यात आले होते.
घरा घरात राष्ट्रवादी मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागात ३ ते ४ निरीक्षक देऊन प्रभागनिहाय गृहभेटींची योजना तयार करण्यात येणार आहे. या निरीक्षकांमार्फत प्रभागनिहाय विकास कामांचा आढावा घेऊन, कोणकोणती विकासाची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, काही कामे अपूर्ण आहेत आणि काही कामांची सुरुवातही झालेली नाही, याचा तपशील तयार करण्यात येणार आहे. शहर युवक कार्यकारणी याविषयी संपूर्ण आढावा घेऊन प्रभागनिहाय अडखळलेल्या कामांचा प्रश्न ऐरणीवर घेऊन आंदोलने करणार आहेत. याचबरोबर संबधित प्रभागातील या मोहिमेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने वेवेगळी जनजागृतीपर आणि पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगणारी पत्रके घरोघरी वाटण्यासाठी तयार केलेली आहेत.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक निलेश पांढारकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, संदीपलाला चिंचवडे, चिंचवड़ विधानसभा अध्यक्ष शाम जगताप, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे आणि सर्व युवक प्रभारी व पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group