पिंपरी (Pclive7.com):- देशासाठी सर्वस्व अर्पण करणा-या माजी सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
‘शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ या योजनेअंतर्गत ही सवलत दिली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २ हजार २८१ माजी सैनिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशसेवा विचारात घेऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि उचित सन्मान देण्याच्या दृष्टीकोनातून मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी क्षेत्रातील महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९, मुंबई महापालिका अधिनियम १९८८ व महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी ५ एप्रिल २०१६ रोजी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात राहणा-या केवळ संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तांना करातून सूट देण्यात आली होती. त्यानंतर ९ जानेवारी २०१७ रोजी संरक्षण दलातील अविवाहित शहिद झालेल्या सैनिकाच्या नामनिर्देशित मालमत्तांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता विविध स्तरातून होणारी मागणी लक्षात घेऊन ९ सप्टेंबर रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने ‘शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ या योजनेअंतर्गत माजी सैनिकांना मालमत्ता करातून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात राहणा-या राज्यातील माजी सैनिक कुटुंबांना मालमत्ता करातून सूट दिली जाणार आहे.
या योजनेचा राज्यातील सुमारे अडीच लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. या करमाफीस पात्र ठरणा-या व्यक्तीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत माजी सैनिकांची संख्या २ हजार २६९ तर शौर्यपदक धारकांची संख्या १२ आहे. या सर्वांना मालमत्ताकर माफ होणार आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात १ कोटी ७३ लाख ६५० रुपयांचा मालमत्ताकर माजी सैनिकांनी भरला आहे. तर, त्यांना ४५ लाख ८३ हजार ३७० रुपयांची सवलत मिळाली होती.






















Join Our Whatsapp Group