पिंपरी (Pclive7.com):- अवैधरित्या देशी, विदेशी आणि बिअर दारूची विक्री करणा-या एका हॉटेलवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये चालक, मालकावर गुन्हा दाखल करत ४९ हजार ७३९ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर हॉटेलमधील ग्राहक आणि वेटरवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
शाम तापकीर, संतोष जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. हॉटेलमधील चार वेटर आणि ११ ग्राहकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस दिघी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, दिघी-आळंदी रोडवर च-होली बुद्रुक येथे द्वारका फॅमिली गार्डन या हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू, बिअरची विक्री केली जात आहे.
त्यानुसार पोलिसांनी द्वारका हॉटेलवर छापा मारला. त्यामध्ये आरोपी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून १० हजार २४० रुपयांची रोकड, ३९ हजार ४९९ रुपयांच्या देशी-विदेशी दारू, बिअरच्या बाटल्या असा एकूण ४९ हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हॉटेल चालक, मालकाच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हॉटेलमध्ये काम करणारे चार वेटर आणि ११ ग्राहक यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये आर्थिक दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील, विशेष पोलीस अधिकारी विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, अमोल शिंदे, राजेश कोकाटे, गणेश करोटे, योगेश तिडके यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group