पिंपरी (Pclive7.com):- कोरोना लसीकरणासंदर्भात महापालिका स्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर संबंधित कृती दलामार्फत लसीकरणाचे नियोजन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार जणांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे. लस ठेवण्यासाठी ३४ ठिकाणी शीत साखळीची सोय केलेली आहे.
कोरोनावरील लस तयार झाली असल्याने पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण सुरू करायचे झाल्यास काय करायला हवे, यासाठी आवश्यक पूर्वतयारीचा भाग म्हणून महापालिकेने लसीकरणासाठी कोरोना टास्क फोर्स स्थापन केले आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे.
लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोणाला लसीकरण करायचे, लस ठेवण्यासाठी शीत साखळीची व्यवस्था काय? लसीकरणासाठी लागणारे मनुष्यबळ, आवश्यक साहित्य, उपकरणे व त्यासाठी करावी लागणारी प्राथमिक तयारी याबाबत सध्या महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात १२ हजार जणांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, करोनाबाबत काम करणारे पोलीस, शासकीय कर्मचारी, मेट्रो आणि रेल्वे कर्मचारी यांना लस देण्याचे नियोजन आहे.
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना राज्य सरकारने आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरात येथून येणाऱ्या प्रवाशांबाबत प्रामुख्याने ही काळजी घेतली जात आहे. महापालिकेने परराज्यातील प्रवाशांना तपासण्यासाठी चिंचवड रेल्वे स्थानकात प्रामुख्याने सोय केली आहे. ताप व करोनाची अन्य लक्षणे असलेले प्रवाशी प्रामुख्याने यामध्ये तपासले जात आहे. चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या पथकामार्फत ही कार्यवाही केली जात असल्याचे डॉ.पवन साळवे यांनी नमूद केले.






















Join Our Whatsapp Group