पिंपरी (Pclive7.com):- महावितरण चिखली, कुदळवाडीतील वीजग्राहकांचे संभाजीनगर शाखेला स्थलांतर करण्याच्या विचाराधीन आहे. मात्र त्याला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे वीजग्राहकांचे संभाजीनगर परिसरात स्थलांतर केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा, ‘फ’ प्रभाग स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी दिला.
याबाबत त्यांनी गणेशखिंड येथील कार्यकारी अभियत्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, महावितरणचे नवीन कार्यालय चिखलीत व्हावे अशी वारंवार मागणी होत आहे. येथील नागरिकांकडून गेल्या काही वर्षांपासून हि मागणी होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मात्र नवीन शाखा देण्याऐवजी नागरिकांना संभाजीनगर येथील शाखेकडे स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यामुळे चिखली, कुदळवाडी परिसरातील नागरिकांना आता जवळचे कार्यालय सोडून संभाजीनगर येथील कार्यालयात जावे लागणार आहे. नवीन शाखा, नवीन कर्मचारी हि मागणी असताना स्थलांतर करून नागरिकांना आणखीनच त्रास दिला जाणार आहे.
काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक सोयीसाठी हि भुमिका घेतली जात असल्याचा आरोप दिनेश यादव यांनी केला. चिखली, कुदळवाडीतील परिसर म्हणजे अधिकार्यांना चरण्यासाठी कुरण आम्ही होऊ देणार नसल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले. नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही. वीज ग्राहकांचे स्थलांतर झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा, या वेळी दिनेश यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.






















Join Our Whatsapp Group