पिंपरी (Pclive7.com):- पोलिसांच्या सततच्या धाडसत्रामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. असे असले तरी शहरात आजही अवैध धंदे जोमात सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा पथकाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे वेळोवेळी उघडकीस आले आहे. एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये चालणारे अवैध धंदे आता दुचाकीवरून चालू लागले आहेत. अशा प्रकारे दुचाकीवर फिरून मटका जुगार घेणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तनवीर कमरुद्दीन खाटीक (वय 42, रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी), जय बालाजी गोसावी (वय 23, रा. चिंतामणी नगर, हांडेवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा जुगार अड्डा मालक आविश खान याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापा सत्र सुरु आहे. त्यामुळे एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये चालणारे जुगार अड्डे आता वेगळ्या प्रकारे सुरु झाले आहेत. ऑनलाइन माध्यमातून तसेच फिरून मटका जुगाराचे आकडे गोळा करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. यावर देखील पोलीस नजर ठेऊन आहेत.
शनिवारी हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक कुणाल शिंदे यांना माहिती मिळाली कि, नेरे दत्तवाडी रोड येथील एका हॉटेलच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत दुचाकीवर थांबून दोघेजण मटका जुगाराचे आकडे घेत आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून तन्वीर आणि जय या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, एक दुचाकी आणि मोबाइल फोन असा एकूण 65 हजार 60 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तनवीर आणि जय हे दोघेजण अविश खान याच्यासाठी काम करत असल्याची कबुली त्या दोघांनी दिली आहे. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group