अन्यथा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार
पिंपरी (Pclive7.com):- मागील अनेक महिन्यांपासून रहाटणीतील कुणाल हॉटेल ते नखाते वस्ती चौकदरम्यानच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. सदर काम पुढील महिन्याभरात पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचा इशारा ‘ग’ प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी दिला आहे.
दरम्यान, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी नुकतेच सदर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासह महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे श्री. गट्टूवार, श्री. ओव्हाळ, श्री. कलाल तसेच ठेकेदार उपस्थित होते. अतिशय संथगतीने सुरू असलेल्या सदर कामाविषयी नगरसेवक त्रिभुवन यांनी नाराजी व्यक्त केली.
यासंदर्भात बोलताना नगरसेवक त्रिभुवन म्हणाले की, रहाटणीतील नखाते वस्ती चौक ते कुणाल हॉटेल हा मार्ग प्रमुख मार्ग असून या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, वाहनचालक ये-जा करतात. सदर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तसेच वाहनचालकांना अनेक दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सदर रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदाराने गांभीर्याने लक्ष घालून हे काम पुढील महिनाभरात पूर्ण करावे. हे काम महिनाभरात पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आपण करणार असल्याचा गर्भित इशारा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी यावेळी दिला.






















Join Our Whatsapp Group