पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाला ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल असे नामकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या पिंपरी महापालिकेच्या महासभेत मान्य करण्यात आला. यासाठी प्रभागातील नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, सुमन पवळे व कमल घोलप यांनी पाठपुरावा केला होता.
याबाबत माहिती देताना मनसे गटनेते नगरसेवक सचिन चिखले म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला वर्षानुवर्ष ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. वर्षानुवर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर पिंपरी चिंचवड शहरातून प्रस्थान करत होत असतो. पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती शक्ती चौकांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती शिल्प उभारले गेले आहे. हे शिल्प पाहण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात.
या चौकांमध्ये वर्षानुवर्ष वाहतूक कोंडी व अपघात मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे या चौकामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ग्रेट सेपरेटर व उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे. या नव्याने होत असलेल्या उड्डाणपुलास जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे नामकरण व्हावे ही सर्वांची इच्छा होती. त्यानुसार ‘फ’ प्रभागाच्या बैठकीमध्ये दिनांक 4/06/2018 रोजी विषय क्रमांक एक व ठराव क्रमांक चार सदस्यांच्या ठरावानुसार भक्ती-शक्ती उड्डाणपुलास जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भक्ती-शक्ती उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. चारही नगरसेवकांच्या वतीने हा ठराव पास करण्यात आला. यामध्ये सूचक-सचिन चिखले, उत्तम केंदळे, व अनुमोदक-सुमन पवळे व कमल घोलप यांनी सदस्य ठराव पास केला.
हा सदस्य ठराव पास केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने काल (दि.२०) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी ठेवण्यात आला. त्यानुसार निगडी येथील उड्डाणपुलास जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती) उड्डाणपूल असे नामकरण करण्यास महासभेने मंजूरी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात हा उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पामधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रोटरी व ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वाकडे आहे अशी माहिती नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group