पिंपरी (Pclive7.com):- विनापरवाना विदेशी दारू आणि बियरची विक्री करणा-या एका चायनीज विक्रेत्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. यात १ लाख ३६ हजार ४८० रुपयांची विदेशी दारू आणि बियर यासह २ लाख ३७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सागर अनिल जाधव (वय २७, रा. हिंजवडी), निलेश रमेश धुमाळ (वय ३३, रा. शेळकेवाडी, घोटावडे, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी जवळ असलेल्या बापूजी बुवा मंदिराच्या जवळ एका चायनीज तंदूर सेंटरवर विनापरवाना दारू विक्री केली जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. पोलिसांनी श्री चायनीज तंदूर सेंटर या दुकानावर छापा मारून कारवाई केली.
त्यात पोलिसांनी १ लाख ३६ हजार ४८० रुपयांची विदेशी दारू आणि बिअर, ५ हजार ९७० रुपये रोख रक्कम, ८० हजारांचा एक ॲपे टेम्पो (एम एच १४ / इ एम ६९८६) आणि १५ हजारांचे दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ३७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group