पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार हे दीड वर्षाचा अधिकचा पदभार भूषवून शासनाची धूळफेक करत आहेत. सध्या संपूर्ण महापालिकेचा कारभार त्यांच्याकडेच आहे. नुकतेच कोरोनाचा एकही रूग्ण नसलेल्या कोविड सेंटरला कोट्यावधी रूपयांची बिले देण्याची किमया त्यांनी केली आहे. अजित पवार यांनी चालविलेल्या मनमानी कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यांच्या मनमानीमुळे सत्ताधारी भाजपाची बदनामी होत आहे. त्यामुळे अजित पवारांना कार्यमुक्त करून शासन सेवेत परत पाठवावे अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक १३/०१/२०२१ रोजीच्या पत्रान्वये मी प्रशासन विभागाकडे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेल्या पदभार संदर्भात माहिती मागविली होती. त्यानुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीमध्ये असे दिसून येते की नगर विकास विभागाकडील दिनांक २४/०७/२०१९ रोजीच्या आदेशानुसार अजित पवार अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. त्यानंतर दिनांक ०५/०९/२०१९ रोजीच्या महसूल व वन विभागाच्या शासन आदेशानुसार अजित पवार यांना अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आलेली आहे. सदर पदोन्नती आदेशामध्ये पवार यांची पदस्थापना जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे या रिक्त पदावर करण्यात आलेली होती व ते सदर पदावर रुजू झालेले आहेत.
परंतु सदर पदावर रूजू झाल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून असलेल्या पदावर हक्क सोडलेला नाही. तसेच त्यांना शासनामार्फत महानगरपालिकेमध्ये राहण्याचे अथवा अतिरिक्त पदभार दिल्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासनाने दिनांक ०९/०९/२०१९ रोजी अजित पवार यांना अतिरिक्त आयुक्त पदावर प्रपत्र बढती द्यावी किंवा त्यांना अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार सोपवावा याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गत करण्याची विनंती करण्यात आली होती.
तथापि, शासनाकडून त्याबाबत कोणताही आदेश अथवा खुलासा करण्यात आलेला नसतांनासुद्धा अजित पवार हे अद्यापही महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांच्याकडे कोणतीही नियुक्ती आदेश नसताना केवळ महापालिका आयुक्तांची मेहेरनजर असल्यामुळे अजित पवार यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून सर्व विभागांची जबाबदारी सोपवलेली आहे असे निदर्शनास येत आहे. तसेच रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त १ व अतिरिक्त आयुक्त ३ या दोन्ही पदांची जबाबदारी सुद्धा सोपविलेली आहे.
शासनामार्फत अजित पवार यांच्या पदोन्नती आदेशामध्ये, संबंधित अधिकारी यांनी पदोन्नतीने पदस्थापनेच्या पदावर रुजू होऊन सध्याच्या पदाचा कार्यभार संबंधित विभागीय आयुक्त / कार्यालय प्रमुखांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून पदस्थापनेच्या पदावर रुजू व्हावे असे स्पष्ट निर्देश आहेत. असे असतांनासुद्धा आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त न करता शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचे कारण समजून येत नाही. इतकेच नसून त्यांच्याकडे सर्व महापालिकेचा कारभार आयुक्तांनी सोपवल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी चालविलेल्या मनमानी कारभाराची अनेक उदाहरणे आहे. नुकतेच कोविड केअर सेंटरचे कोणतेही कामकाज न केल्याने स्पर्श हॉस्पिटल ला ३ कोटी ५० लाखाचे बिले स्थायी समितीच्या मान्यतेने विना आदेश देण्याची किमया अजित पवार यांनी साधली आहे. अशी अनेक कामे अजित पवार यांनी ठेकेदारही संगणमत करून अधिकाऱ्यांना धारेवर धरून करून घेतलेले आहेत.
आयुक्त हर्डीकर यांना देखील या सर्व कायदेशीर बाबी ठाऊक असून ते अजित पवार यांना पाठीशी घालण्याचे शौर्य का दाखवीत आहेत. ही देखील एक पडताळणी करण्याची बाब आहे. त्यामुळे कोणताही शासन आदेश नसतांना अजित पवार यांची महानगरपालिकेमध्ये असलेली नियुक्ती रद्द करून त्यांना तत्काळ शासन सेवेत परत पाठविण्यासाठी कार्यमुक्त करावे. तसेच मनपामध्ये अतिरिक्त आयुक्तांनी चालविलेला कारभार त्वरित थांबवा. याप्रकरणांमुळे सत्ताधारी पक्षाची बदनामी होऊन महापालिकेमध्ये सुरू असलेला गैरकारभार चव्हाट्यावर येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करून सदर याबाबत तात्काळ खुलासा करण्यात यावा अशी मागणी संदीप वाघेेरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
अजित पवार यांच्याकडे जिल्हा जातपडताळणी समिती पुणे अपर जिल्हाधिकारी पदाचा मूळपदभार आहे. परंतु अजित पवार हे दिवसभर पूर्ण वेळ पिंपरी चिंचवड महापालिकेतच ठाण मांडून असतात तर मग ते जात पडताळणी अपर जिल्हाधिकारी म्हणून कधी काम करतात असा माझ्या सारख्या लोकप्रतिनिधी समोर प्रश्न आहे.
संदीप वाघेरे – नगरसेवक






















Join Our Whatsapp Group