मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखलेंच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
पिंपरी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार असून राज्य शासनावर १७० कोटी ३ लाख इतका खर्चाचा भार असेल.
या मार्गिकेची लांबी ४.४१ कि.मी. इतकी असून यात ३ स्थानके आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतू (एसपीव्ही) मार्फत करण्यात येईल. यासाठी केंद्र शासनाचे एकूण खर्चाच्या १० टक्के सहभाग असून कर्जाच्या स्वरुपात देखील निधी उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाचा एकूण ७९ कोटी ४ लाख तसेच ९० कोटी ६३ लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज असे एकूण १७० कोटी ३ लाख असा सहभाग असेल. निगडी ते स्वारगेट मार्गिकेसाठी २०२३ मध्ये ४.९५ लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल असा अंदाज आहे.
मनसेच्या पाठपुराव्याला यश..
मेट्रो निगडीपर्यंत व्हावी ही मनसेची सुरूवातीपासून मागणी होती. निगडीतील हजारो नागरिकांचा विचार करून आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले होते. वेळप्रसंगी मेट्रोचे काम बंद पाडू असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला होता. आज राज्य सरकारने पिंपरी ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आले असून निगडीतील रहिवाशांना न्याय मिळाला आहे.
– सचिन चिखले : शहराध्यक्ष, नगरसेवक मनसे.