पुणे (Pclive7.com):- पुणे महापालिका निवडणुक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार, अशी घोषणा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. दरम्यान, राऊत यांच्या विधानामुळे काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये सुध्दा एकत्र लढणार काय या प्रश्नावर होय असे उत्तर खासदार संजय राऊत यांनी दिले.
एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकेलेले पाऊल असंत, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी, असा विचार करण्यात येईल. निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल, असंही राऊत म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी-शिवसेनेच्या संपर्कात..
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता असून राष्ट्रवादी आणि शिवेसना विरोधात आहेत. १२८ पैकी ७७ नगरसेवक भाजपाचे, ३६ राष्ट्रवादी, ९ शिवसेना, १ मनसे आणि ५ अपक्ष असे संख्याबळ आहे. त्यापैकी राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक मयत तर भाजपाचा एक नगरसेवक मयत आहेत. आजवरची मतांची टक्केवारी पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले तर भाजपाच्या सत्तेला सुरूंग लागू शकतो. भाजपामधील तब्बल ४० नगरसेवक आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्या अर्थाने खासदार संजय राऊत यांच्या विधानाला मोठा अर्थ आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांनी सत्ताधारी भाजपा बदनाम होत चालल्याने मतदारांचा ओढा आता पुन्हा राष्ट्रवादीच्या दिशेने आहे.























Join Our Whatsapp Group