पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रूग्ण वाढण्यास गेल्या आठ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. शहरात आज ४५३ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने शहरात १९ कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. तसेच कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी शहरातील तब्बल १८ हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पिंपरी चिंचवडकरांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ‘लॉकडाऊन’ची गरज पडणार नाही असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले आहे.
महापालिकेने जाहिर केलेले १९ कंटेनमेंट झोन खालील प्रमाणे..
(आकुर्डी, संभाजीनगर, जाधववाडी, दत्तनगर, घरकुल, जुनी सांगवी सातपुडा सोसायटी, जुनी सांगवी मधुबन, जुनी सांगवी मधुबन, बौध नगर, विजयनगर काळेवाडी, नढेनगर काळेवाडी, अशोक थिएटर वाघेरे पार्क, रोजलेंड रेसिडेन्सि पिंपळे सौदागर, प्लॅनेट मिलेनिअम पिंपळे सौदागर, म्हस्के वस्ती रावेत, शिंदे वस्ती रावेत, भोंडवे कॉर्नर रावेत, आदर्श हाऊसिंग सोसायटी चिंचवडेनगर, सोनिगरा ओपेल चिंचवड स्टेशन)
आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हि चिंतेची बाब असून नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरामध्ये सध्या लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसून नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोना वाढ रोखणे शक्य होईल.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरामध्ये भरारी पथकांची नियुक्ती केली असून या पथकांद्वारे मास्क न लावणा-या आणि रस्त्यावर थुंकणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, समारंभांच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन कोरोना विषयक नियमांचे पालन होते कि नाही याबाबत तपासणी करणे तसेच गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करणे यांसारख्या कारवाया केल्या जात आहेत.
शहरात कोरोना नियमांचे पालन न करणा-या १८ हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ४५ हजार रूपये दंड वसूल केला आहे. शहरात विना मास्क फिरणा-या आणि रस्त्यांवर थुंकणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणेसाठी प्रभाग निहाय ८ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विना मास्क फिरणा-या नागरिकांकडून एकूण १ कोटी ६४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर थुंकणा-या नागरिकांकडून एकूण ८ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील १९ ठिकाणं सध्या कंटेटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून पिंपरी, भोसरी, दिघी, मोशी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागांमध्ये रुग्णावाढ झाली आहे. कोरोना विषयक नियमांचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group