पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार यावरून सत्ताधारी भाजपात बरेच नाट्य सुरू होते. याचाच फायदा उचलण्यासाठी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने रिंगणात उडी घेतली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रविण भालेकर यांना उमेदवारी दिली असून आज (दि.०२) त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी ३ ते ५ यावेळेत मुदत होती. शुक्रवारी (दि.०५) रोजी दुपारी १२ वाजता सभापती पदासाठी निवडणुक होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.
पक्षीय बलाबलानुसार संख्याबळ जास्त असल्याने स्थायीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारीमुळे ही निवडणुक आता बिनविरोध होणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.
भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.





















Join Our Whatsapp Group