पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार यावरून बरेच नाट्य घडले. नव्या जुन्याचा वाद झाला, दबावतंत्र वापरण्यात आले. अखेरीस भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सर्व ताकद लावत नितीन लांडगे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून घेतली आहे. नितीन लांडगे यांचा स्थायीच्या सभापती पदाचा उमेदवारी अर्ज आज (दि.०२) दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी ३ ते ५ यावेळेत मुदत होती. शुक्रवारी (दि.०५) रोजी दुपारी १२ वाजता सभापती पदासाठी निवडणुक होणार आहे.
यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर केशव घोळवे, आदी उपस्थित होते.
पक्षीय बलाबलानुसार भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने स्थायीच्या सभापतीपदी नितीन लांडगे यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.
भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.





















Join Our Whatsapp Group