पिंपरी (Pclive7.com):- तडीपार असतानाही शहरात आलेल्या आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा प्रकार रावेत येथे घडला. निखिल साहेबराव साठे (वय २७, रा. दळवीनगर, पत्रा शेड, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस हवालदार जयंत राऊत यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी निखिल साठे याला ३१ डिसेंबर २०२० ला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पुणे जिल्ह्यात आला.
गुरुवारी (ता. ११) दुपारी साडेचार वाजता तो रावेतकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणाऱ्या रोडवरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी निखिल याने फिर्यादी यांच्याशी झोंबाझोंबी करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
याप्रकरणी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group