पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या चार रुग्णालयात बसविण्यात येणाऱ्या मेडिकल गॅस पाईपलाईनच्या निविदा प्रक्रियेत त्रुटी आहेत. ठेकेदाराने जोडलेल्या कागदपत्राच्या मूल्यमापनात गंभीर चुका निर्दशनास आल्याचा आरोप करीत गॅस पाईपलाईन निविदा रद्द करण्याची मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या चार रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईन बसविणेत येणार आहे. त्याकरिता दुस-यांदा निविदा प्रसिध्द करण्यात आली. परंतू, एल1 आलेल्या ठेकेदाराने जोडलेल्या कागदपत्राच्या मूल्यमापनात गंभीर चुका निर्दशनास आलेल्या आहेत.
त्या ठेकेदार कंपनीने इंडस्ट्रीज क्षेत्रात वापरणा-या उत्पादित कंपनीचे ‘प्राॅडक्ट’ वापरत आहेत. शिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीन कंपनीच्या उत्पादित केलेले साहित्य देखील वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही ‘शुभम ईपीसी’ ठेकेदाराने ‘एजीएसएस सिस्टीम’ हे चीनच्या उत्पादित कंपनीचे असल्याचे आढळून आलेले आहे.याकडे संबंधित पालिकेच्या अधिका-यासह सल्लागाराने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
महापालिकेने नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव आणि आकुर्डी या चार रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन बसविण्यात येणार आहे. त्याकरिता भांडार विभागाने निविदा नोटीस क्रमांक 43/2020-21 जानेवारी महिन्यात ४ जानेवारीला प्रसिद्ध केली होती. २६ कोटी ६१ लाख रुपयांच्या या निविदेसाठी सुरुवातीला ५ निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता. मात्र, कुठलेही कारण न देता तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदा रद्द केली होती.
त्यानंतर नव्याने सूचना क्रमांक 48/202021 द्वारे २८ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. निविदेसाठी ५ फेब्रुवारी ही सात दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यावेळी निविदापूर्व बैठक घेतलेली नाही. या निविदेत ९ जण सहभागी झाले. यापैकी ८ ठेकेदार पात्र ठरले असून एकजण अपात्र ठरला आहे.
ठेकेदार पात्र-अपात्र ठरविताना संबंधित अधिकारी व सल्लागाराने आपल्या मर्जीतील ठेकेदार कंपनीचे त्रुटीकडे आणि पात्रतेसाठी लागणा-या कागदपत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. प्री-बिड न घेतल्यामुळे कित्येक ठेकेदाराने अर्टी-शर्तीची पूर्तता न केल्याचे दिसूनही त्या तक्रारीकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केले, असे तुषार कामठे यांनी निवेदनात म्हटले आहे.