पुणे (Pclive7.com):- कोरोनाच्या या संकट काळात रूग्णांना ‘रेमडेसीव्हीर इंजेक्शन’ हे वरदान ठरत आहे. वाढत्या मागणीमुळे या इंजेक्शनची चढ्या भावात विक्री होत आहे. म्हणूनच या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांनी महत्वपूर्ण आदेश दिलेत.
रेमडेसीव्हीर इंजेक्शनची जबाबदारी संबंधित रुग्णालयांची असणार आहे. कोविड रुग्णाला औषधे रुग्णालयाने उपलब्ध करावी, नातेवाईकांना बाहेरुन घेउन येण्यास सांगू नये. औषधांची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी. कोविड रुग्णांचा अंदाज घेउन आवश्यक साठा करावा त्याची रीतसर नोंद करावी. औषधांचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे विभागीय आायुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
● पुणे विभागीय आयुक्त यांचे महत्वपूर्ण आदेश!
▪१. रुग्णालयांनी कोविड रुग्णालय सुरु करण्यापुर्वी त्यांच्या हद्दीतील सक्षम आरोग्य अधिकारी यांचेकडे कोविड हॉस्पीटल म्हणून नोंद करणे आवश्यक असून त्याची माहिती दररोज पुणे विभागाच्या डॅशबोर्डवर भरणे बंधनकारक आहे.
▪२. कोविड रुग्णालयाने त्यांचे रुग्णालय शासन मान्यताप्राप्त असलेले प्रमाणपत्र ,त्यांचे संलग्न असलेले मेडिकल स्टोअर चे परवाने यांचेसह घाऊक औषध विक्रेता किंवा सी अॅण्ड एफ एजंट यांचेकडे लेखी मागणी नोंदवावी.
▪३. रेमडेसीव्हीर इंजेक्शनची मागणी करताना रुग्णालयामधील रुग्णसंख्या विचारात घेऊन व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडेसीव्हीरची आवश्यकता आहे अशी संख्या विचारात घेऊन तीन दिवस पुरेल एवढया इंजेक्शन साठ्याची मागणी नोंदवावी. सदर औषधांची मागणी नोंदवण्यापुर्वी केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा कोविड क्लीनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा.
▪४. घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी अॅण्ड एफ एजंट यांनी रुग्णांची कागदपत्रांची योग्य प्रकारे शहानिशा केल्यानंतर संबंधीत रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा व त्याबाबतचे सर्व अभिलेख जतन करावे.
▪५. कोविड रुग्णालयाशी संलग्न नसलेले किरकोळ औषध विक्रेत्यांना रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करु नये.
▪६. सर्व घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी अॅण्ड एफ एजंट यांनी दररोज विक्री केलेल्या रेमडेसीव्हीर इंजेक्शनची माहिती उदा. कोविड रुग्णालयाचे नांव, संलग्न मेडिकलचे नांव, बिल क्रमांक, दिनांक एकूण विक्री संख्या इत्यादी बाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयास यांना दररोज सादर करावी.
▪७. ज्या रूग्णालयांच्या आवारात संलग्न मेडिकल स्टोअर्स नाही त्यांनी स्वतः रेमडेसीव्हीर इंजेक्शनची खरेदी घाऊक औषध विक्रेते किंवा सी अॅण्ड एफ ऐजंट यांचेकडून करावी, तसेच औषधे व सांदयं प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार औषध खरेदी व वितरणाबाबत अभिलेख ठेवावा व त्यामध्ये रजिस्टर ठेवून त्यात दिनांक दिवसाच्या सुरुवातीचा साठा, पुरवठादाराचे नांव, बिल क्रमांक खरेदी केलेला साठा, औषधाचे नांव, समूह क्रमांक, औषध पुरवठ्याचा दिनांक, रुग्णांचा तपशील, पुरवलेले इंजेक्शन, डॉक्टरांचे नांव, आकारलेली किंमत इत्यादी माहिती अद्यावत ठेवावी. इंजेक्शनचा खरेदी वापर विक्री व शिल्लक साठा यांचा ताळमेळ ठेवावा.
▪८. रुग्णालयांनी स्वत: कोविड रुग्णांना औषधे उपलब्ध करुन दयावीत, रुग्णांच्या नातेवाईकास बाहेरुन घेऊन येण्यास सांगु नये.
▪९. कोविड रुग्णालयाने रुग्णांना औषधांची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी.
▪१०. काही कारणांने रेमडेसीव्हीर इंजेक्शन या औषधाचा पुर्ण डोस देण्यात आला नाही तर त्याचा उर्वरित साठा हॉस्पीटल, मेडिकल स्टोअर्स यामध्ये परत करावा व त्याचे अभिलेख ठेवावे.
▪११. कोविड रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांचेवर बारीक लक्ष ठेवावे व रुग्णालयामध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात गैरप्रकार आढळुन आल्यास रुग्णालय व्यवस्थापनास जबाबादार धरण्यात येईल.
सदर आदेश दिनांक ११/४/२०२१ पासून अंमलात येतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ तसेच भारतीय दंड विधान १८६० चे कलम १८८ व औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व कार्याला नियम १९४५ प्रमाणे सर्व दंडनिय-कार्यवाहीस-पात्र राहील असे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.