पिंपरी (Pclive7.com):- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या महामारीचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड शहरातही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस शहरात वाढत असून गेल्या दहा दिवसांत (दि.०१ ते १० एप्रिल) कोरोनाने तब्बल १९२ बळी घेतले आहेत. तर २५ हजार २२९ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. दरम्यान शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला असून रेमडेसिव्हर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, लसींचा पुरवठा यांची मोठी कमतरता भासत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या या महामारीत शहरातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला आहे. दिवसाला दोन ते अडीच हजार रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. शहरातील महापालिकेचे तसेच खाजगी हॉस्पिटल देखील फुल झाले आहेत. कोरोना रूग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. शहरात कोरोना रूग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन बेडसाठी रूग्णांच्या नातेवाईकांना अथक प्रयत्न करावे लागत आहेत.
या संकट काळात नागरिकांना गांभिर्य नाही अशीही परिस्थिती आहे. दररोज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या संख्येत कारवाई होत आहे. आरोग्य तसेच पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत आहे. महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत. महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि विरोधक यांच्यात कोणताच ताळमेळ नाही. या काळातही सत्ताधारी आणि विरोधक राजकीय कुरघोड्या करण्यात मग्न आहेत.
शहरात शनिवार दि.१० एप्रिल २०२१ पर्यंत १ लाख ६५ हजार ३६७ जण कोरोनाबाधित झाले होते. १ लाख ३७ हजार ९२४ रूग्ण पूर्णपणे बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात आजअखेर ३०३२ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या २५ हजार २८५ कोरोना बाधित रूग्ण असून ५,०१९ जणांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २० हजार २६६ रूग्ण होम क्वारंटाईन आहेत.
दि.०१ एप्रिल ते दि.१० एप्रिल पर्यंतचे कोरोना अपडेटस्
दिनांक रूग्ण मृत
०१ एप्रिल २११३ १७
०२ एप्रिल २४६३ १९
०३ एप्रिल २८३२ १७
०४ एप्रिल ३३८२ १८
०५ एप्रिल २१५२ १६
०६ एप्रिल २९०४ १७
०७ एप्रिल २७८४ १६
०८ एप्रिल २३५१ २१
०९ एप्रिल २००९ २३
१० एप्रिल २२३९ २८
एकूण :- २५२२९ :- १९२