पिंपरी (Pclive7.com):- कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याने 18 ते 44 वयोगटामधील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे. वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनाच ‘कोविशिल्ड’ लसीचा दुसरा डोस उद्या (गुरुवारी दि.१३) रोजी देण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन पिंपरी चिंचवड महापालिका लसीकरण केंद्रावर आज 10 हजार 509 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.
फक्त वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस पूर्ण क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन देण्याची कार्यवाही सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत सर्व लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे.
त्यामुळे वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.