पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांना कोविड लसीकरण कॅम्प आयोजनास परवानगी द्यावी अशी मागणी भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे. काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाचे १८ वर्षांच्या वरील सर्व नागरीकांचे लसीकरण करण्याच्या धोरणास अनुसरून सध्या शहरात लस उपलब्धतेनुसार महापालिकेमार्फत लसीकरण सुरू आहेच. याशिवाय शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील शासन निर्देशानुसार लसीकरण सध्या सुरू आहे. परंतू यात थोड्या फार प्रमाणात मर्यादा येत आहेत. विविध वयोगटातील व व्यवसायातील नागरिक त्यांच्या सोयीनुसार लसीकरणास जाऊ शकत नाहीत. तसेच गेले तरी लस कमतरतेमुळे लसीकरण होईलच असेही होत नाही.
या शिवाय शहारातील जेष्ठ नागरिकांना अनेक वेळा लसीकरण केंद्र दूर असल्यामुळे खुप अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शहरातील लसीकरणाचा वेग मंदावत आहे व पर्यायाने पेशंटची संख्या वाढण्याचा धोका कायम आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून लोकांना अधिकाधिक ठिकाणी खात्रीशीर पध्दतीने लसीकरण उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील अनेक नागरिक आज खात्रीशीर लसीकरण सेवा उपलब्ध होण्याबाबत मागणी करीत आहेत. या मागणीचा विचार करता आम्ही आपले लक्ष पुणे महापालिकेच्या उपक्रमाकडे वेधू इच्छीतो. पुणे महानगरपालिकेने शहरात विविध रहिवाशी सोसायट्यांमध्ये खाजगी हॉस्पिटलच्या सहकार्याने लसीकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर लसीकरण कॅम्प घेण्यास अनुमती दिलेली आहे. व या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
लसीकरण मोहीम स्थानिक पातळीवर खात्रीलायक रित्या व सोसायटीमधील रहिवासी या सर्वांच्या सोयीनुसार होत असल्यामुळे अशा प्रकारे कॅम्प आयोजनात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व पर्यायाने लसीकरणाचा वेग वाढत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरातील खाजगी हॉस्पिटल व स्थानिक रहिवासी सोसायटी यांना परस्पर स्वसंगनमताने अशा प्रकारचे लसीकरण कॅम्प आयोजनास महापालिकेने पूर्व परवानगीने अनुमती देण्यात यावी.
यासाठी आवश्यक ते आदेश त्वरीत निर्गमीत करावेत. जेणे करून शहरातील सर्व नागरीकांना स्थानिक पातळीवर खात्रीलायक रित्या त्यांच्या सोयीप्रमाणे लस उपलध होईल. तसेच शहारातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट महापालिका नक्कीच लवकर साध्य करू शकेल. तरी या मागणीचा तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा असे शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group