पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाले चाकू व सुरा चालविणारे नाहीत. ते सेवा देणारे घटक आहेत. त्यामुळे सरसकट फेरीवाल्यांना गुन्हेगार ठरवू नका, अशी भूमिका कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांनी घेतली.
निगडी लोकमान्य टिळक चौक या ठिकाणी टपरी पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. महापालिका स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी सर्व पथारी, हातगाडी धारक गुन्हेगार आहेत, असे गृहीत धरून अतिक्रमण पथकाला सुरक्षा देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात अशी एकही घटना न घडता दिलेला आदेश हा फेरीवाल्यांचा अपमान करणारा आहे. महाराष्ट्रात २० लाखांपेक्षा अधिक फेरीवाले आहेत.
अनेक वर्षांपासून नागरिकांना सेवा देण्याबरोबरच स्वतःच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह करून रोजगार निर्मिती देखील ते करत आहेत. या फेरीवाल्यांना ठाणे येथील एका घटनेवरून गुन्हेगार ठरवून दुजाभावाची वागणूक दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कांबळे यांनी दिला.
या वेळी बसवराज नाटेकर, संतोष यादव, काळूराम कांबळे, सुनील गायकवाड, सचिन म्हेत्रे, दत्ता लोखंडे, बाबू कुरेशी, धनराज चव्हाण, सनी गायकवाड, सुरेश शिंदे, अंकुश गुंजाळ, बाळासाहेब राम गायकवाड, बंडू डोंगरे, महेश उदगे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group