पिंपरी (Pclive7.com):- चिखली आणि परिसरात सध्या ऐन दिवाळीच्या तोंडावर समस्यांचा शिमगा झालेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या ‘डोळेझाक’ भूमिके विरुद्ध येथील सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी आज (दि.१४) लाक्षणिक उपोषण केले.
याबाबत बोलताना विकास साने म्हणाले की, चिखली आणि परिसरामध्ये तळवडे तसेच आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रात नोकरी करणारे हजारो नागरिक तसेच त्यांची कुटुंबे राहतात. महापालिकेला दरवर्षी हे नागरिक लाखो रुपयांचा टॅक्स भरतात. तरी देखील नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांकडे महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
चिखली मधील देहू-मोशी रस्ता ते मेमोरिया सोसायटी तसेच त्या भागात जाणारा रस्ता गेले कित्येक महिने मृत्यूचा सापळा बनलेला आहे. तसेच चिखलीमध्ये मोठी लोकसंख्या वास्तव्यास असल्यामुळे या कुटुंबाना असणारी पाण्याची गरज महापालिका प्रशासनाकडून पूर्ण केली जात नाही. देहू रास्ता ते मोमोरिया सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बस थांबा करण्याची गरज आहे जेणेकरून येथील नागरिकांना शहरात जाण्यासाठी सोयीस्कर होईल.
सततचा अपुरा पाणी पुरवठा आणि खराब रस्ते यामुळे येथील नागरिक त्रस्तावले आहेत. महापालिकेला दरवर्षी लाखो रुपये टॅक्स भरून देखील महापालिका नागरिकांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्यामुळे जनतेमधे रोष दिसत आहे.
याबाबत विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनच्या वतीने विकास साने यांनी वेळोवेळी विनंती पत्रव्यवहार करून देखील या समस्यांची कोणतीही दखल महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाकडून घेतली जात नाही.
याउलट समस्या जैसे थे ठेऊन जनतेस वेठीस धरण्याचा अघोरी प्रकार महापालिका आणि सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि विकास साने सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि चिखली मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने यांनी आज प्रशासनाचा निषेध म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.
या उपोषणास सर्व सोसायटी आणि समस्त चिखली मधील नागरीकांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेविका स्वाती साने, अँड. प्रकाश मोरे, सतीश मोरे, ज्ञानेश्वर मोरे, अँड. सुदाम साने, उद्योजक जांभुळकर, रिव्हर रेसिडेन्सीचे सचिव चंद्रशेखर सस्ते, दिगंबर काशीद, रस्टिक सोसायटीचे मारुती शिंदे, मेमोरिअल सोसायटीचे चेअरमन योगेश अहिरे, गणेश किवळे, उद्योजक शांताराम मोरे, विस्टरिया सोसायटीचे बाबासाहेब गायकवाड, बाळू पोळ, ब्लू डायिज सोसायटीचे रामेश्वर राऊत, प्रवीण पिंजण, दत्तात्रय कांबळे, महेश जोशी आदींनी उपस्थित राहत या उपोषणला पाठिंबा दर्शविला.
महापालिकेने त्वरित या समस्यावर उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काही दिवसात तीव्र असे जनआंदोलन विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन आणि समस्त चिखली आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने केले जाईल असा इशारा विकास साने यांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group