पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सेवाज्येष्ठ अधिका-यांना पदोन्नती द्यावी. अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवासेनेने दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असून सुद्धा कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांना अद्याप पदोन्नती दिली गेली नाही. कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नसताना जाणून बुजून त्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असणारे अधिकारी यांची पदोन्नती जर होत नसेल तरी यापूर्वी केलेल्या १३ अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य आहे. त्याबाबत सबळ पुरावे आहेत.
त्यांच्या नियमबाह्य पदोन्नती रद्द करण्यात यावी. अन्यथा जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने थांबविण्यात आलेल्या पदोन्नतीच्या निषेधार्थ महापालिकेसमोर १ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके यांनी दिला आहे.