मौलाना आझाद जयंतीनिमित्त शहर काँग्रेसची अभिवादन सभा
पिंपरी (Pclive7.com):- भारताचे पहिले शिक्षणमंत्री, स्वातंत्र सेनानी, थोर विचारवंत, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३३ व्या जयंती निमित्त शहर काँग्रेसकडून खराळवाडी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी सुरूवातीस काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी जामा मस्जिदचे विश्वस्त अज्जूभाई शेख याप्रसंगी म्हणाले, “मौलानाजींचे कार्य प्रेरणादायक आहे त्यांनी भारत देशात हिंदू मुस्लिम एकत्मतेसाठी विशेष प्रयत्न केले. ते एक ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक, उत्तम लेखक, उर्दू कवी, पत्रकार व प्रतिभावंत राजकारणी होते. आज देशातील हिंदू मुस्लिमांना लढवून जे लोक राजकारण करत आहेत त्यांना आपण न जुमानता देशातील सामाजिक एकात्मता अबाधित ठेवणे हिच मौलाना जींना श्रध्दाजंली व त्यांचे कार्य पुढे नेणे ठरेल”.
डॉ. कैलास कदम म्हणाले, “मौलाना जी हे वयाच्या ३५ व्या वर्षी काँग्रेसचे सर्वात तरूण राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांचे काम स्वातंत्र्य चळवळी पूर्वी पासूनच सुरू झाले व खिलाफत चळवळीचे नेते असताना ते गांधीजींच्या संपर्कात येऊन स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते बनले. पुढे मौलाना आझाद हे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक बनले. भारत छोडो चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले.
जामिया मिलीया ईस्लामिया विद्यापीठ अलिगढ, उत्तरप्रदेशचे ते संस्थापक सदस्य म्हणून निवडून आले. त्यांचे संपूर्ण कार्य हे युवकांना प्रेरणा देणारे व उर्जा देणारे आहे. आजच्या आपल्या देशाचा परिस्थितीत मौलानाजींचे विचार आपणांस मार्गदर्शक व उपयोगी ठरणारे आहेत. त्यांचे विचार व कार्य पुढे नेण्याचा संकल्प करणे हेच आपले कर्तव्य आहे ते करून मौलानां यांना आदराजंली अर्पण करूया”.
या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, माजी नगरसेवक सदगुरू कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, के.एम.रॅाय, के हरीनारायणन, अय्युब शेख, अज्जूभाई शेख, अय्युब कुरेशी, आनंदराव फडतरे, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, विजय ओव्हाळ, माऊली मलशेट्टी, संजीव झोपे, बसवराज शेट्टी, रोहीत तिकोणे आदी पदाधिकारी व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group