पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिस आणि सांगवी खुनातील तीन आरोपींमध्ये रविवारी रात्री सिनेस्टाइल चकमक उडाली. पोलिसांना पाहताच आरोपींनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, तर पोलिसांनीही आरोपींवर दोन गोळ्या झाडल्या. हे प्रकरण एवढ्याच थांबले नाही तर, पळून जाणाऱ्या आरोपींच्या अंगावर खुद्द पोलिस आयुक्तांनी बाहुबली स्टाइलने झाड फेकल्याने तिन्ही आरोपी खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी झडप घालून आरोपींना जेरबंद केले.

गणेश हनुमंत मोटे (वय २३), महेश तुकाराम माने (वय २३), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २२, सर्व रा. सांगावी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास योगेश जगताप याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एक अल्पवयीन आरोपीस सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडूनही दोन पिस्तूल जप्त करण्यात आली होती.
आयुक्तांच्या पराक्रमाबाबत दावे, प्रतिदावे…
आरोपींना पकडण्यासाठी आयुक्तांनी बाहुबली बनत झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकल्याचा दावा केला जात आहे. आयुक्तांचा हा कारनामा कौतुकाबरोबर चर्चेचा विषय ठरला आहे. झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकने हे खूपच सिनेस्टाईल वाटत असून, नक्की असे घडले का, अशी प्रतिक्रियाही विविध स्तरांतून उमटत आहे.
आयुक्तांना खरचटले..
आयुक्तांवर कोणताही गोळीबार झाला नाही. आरोपींना पकडताना तसेच झाड उचलताना त्यांना थोडेसे खरचटले आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयुक्तांनी उचललेले झाड चाकण पोलीस ठाण्यात…
पोलिस आयुक्तांनी उचललेले झाड चाकण पोलिस ठाण्यात आणून ठेवण्यात आले आहे. चकमकीत तसेच आरोपींना पकडण्यासाठी वापरण्यात आल्याने हे झाड पोलिस ठाण्यात आणले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group