पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे 13 मार्चपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागली असून आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपूनही शहरात महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांचे जनसंपर्क कार्यालय, निवासस्थान असे दिशादर्शक लावलेले फलक अद्याप काढण्यात आलेले नाहीत. हे दिशादर्शक फलक तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवक यांचा कार्यकाळ दिनांक 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यांनतर महापालिकेत प्रशासक राजवट लागली असून पालिकेचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र, शहरात सर्वत्र महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेते, नगरसेवक, विविध समिती सदस्य, सभापती यांच्या नामफलकांचे फलक जैसे थे आहेत. महापालिकेतील सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. त्या सर्वांचे जनसंपर्क कार्यालय,निवासस्थानाचे दिशादर्शक फलक काढणे आवश्यक आहे.
तसेच नगरसेवक अजूनही लेटरहेडवर महापालिकेची मुद्रा वापरत आहेत. त्यांच्या खासगी गाडीवर देखील नगरसेवक पदाचे स्टिकर, बोर्ड, महापालिकेची मुद्रा लावत आहेत. नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालय, निवासस्थानाकडे असे दिशादर्शविणारे फलक देखील काढले गेले नाहीत. याशिवाय मागील दहा वर्षातील कित्येक माजी नगरसेवकांचे फलक देखील अद्याप काढलेले नाहीत. हे फलक वर्षांनूवर्षे काढले जात नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिक संभ्रमात पडतात. या फलकांने शहराचे विद्रुपीकरण देखील वाढले आहे.
दरम्यान, शहरात माजी नगरसेवकांचे नामफलक, दिशादर्शक फलक,व अनधिकृतरित्या बसवलेले फलक हे आपण तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे साळवे यांनी केली आहे.