पुणे (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. जन्मानंतर मुलीला चक्क हेलिकॉप्टर सफारी करत घरी आणण्यात आले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबीयांनी मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा आहे, असे समजून मुलीच्या जन्माचे जंगी आणि अनोखे स्वागत केले आहे.

छोट्या परीला हेलिकॉप्टरमधून घरी आणत अनोख्या पद्धतीने मुलीचे स्वागत करत गावातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही दिला आहे. या ग्रॅण्ड वेलकमने गावकरीही आनंदात आहेत. कारण झरेकर कुटुंबाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय आम्ही घेतला, असे कुटुंबीयांनी आनंदाने म्हटले आहे. गावातही एक उत्साहाचे वातावरण यानिमित्ताने पाहायला मिळाले.
‘आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती’
राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म २२ जानेवारी रोजी भोसरी येथे तिच्या आईच्या घरी (माहेरी) झाला आणि बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले, असे मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले. ते व्यवसायाने वकील आहे. ते म्हणतात, “आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही १ लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केली.” मुलीच्या जन्मानंतर तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणण्यात आले.
दिला अनोखा संदेश..
या अनोख्या स्वागताने समाजात एक संदेश दिला गेला आहे. आजही काही ठिकाणी मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडले जाते. त्यांच्यासाठी तर हा संदेश महत्त्वाचा आहे. मुलगी हाच वंशाचा दिवा मानून तिचे स्वागत करायला हवे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.
Tags: खेड तालुकाछोट्या परीचं स्वागतझरेकर कुटुंबपुणे जिल्हामुलगी झाली होमुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागतशेल पिंपळगावहेलिकॉप्टर सफारी





















Join Our Whatsapp Group