पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षणाबाबत आज (दि.०६) अखेर २७३ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर विचार करून १३ तारखेला अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.

३१ मे रोजी महिलांच्या ७० जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. १३९ जागांपैकी ७० जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या (एससी) २२ जागांपैकी ११, अनुसूचित जमातीच्या (एसटी) ३ पैकी २ आणि सर्वसाधारण खुल्या गटातील ११४ पैकी ५७ अशा एकूण महिलांच्या ७० जागांसाठी ही आरक्षण सोडत झाली. त्यावर हरकती घेण्यासाठी १ ते ६ जून दरम्यान मुदत देण्यात आली होती. त्यानुसार दिलेल्या मुदतीत २७३ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
महिलांचे आरक्षण पडल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग उडाले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, काही विद्यमान नगरसेवक आणि गावकी – भावकीतील अनेक जण आमने-सामने येणार आहेत.
निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, निवडणूक आरक्षणाबाबत आजअखेर प्राप्त हरकतींबाबत स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्यामध्ये आवश्यक बदल करून १३ तारखेला प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी येत्या १७ तारखेला प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.






















Join Our Whatsapp Group