पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ १९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा जून महिना संपत आलातरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवू शकते.

दरम्यान शुक्रवारपासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊनच कपातीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पवना धरणात ३६ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास शहरवासीयांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीस मावळातील पवना धरणातून १०० टक्के पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील जलउपसा केंद्रातून प्राधिकरणातील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरात उभारण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. तेथून जलवाहिन्याच्या माध्यमातून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. शहरात सध्या ५४० एमएलडी पाणीपुरवठा होता. हे पाणी शहरातील अर्ध्या भागात एक दिवस आणि उर्वरित भागात दुसऱ्या दिवशी पुरविले जाते. पाणी उपसा करण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
यंदा केवळ २४ मिमी पाऊस
गेल्या वर्षी पवना धरण परिसरात आजअखेरपर्यंत ४८० मिमी पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी केवळ २४ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पाऊसच कमी असल्याने किंवा पाऊस लांबल्यास पाणी कपातीचे संकट शहरावर येऊ शकते.






















Join Our Whatsapp Group