मुंबई (Pclive7.com):- हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की….. अशी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राजभवनमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंडाचा झेंडा पुकारला तेव्हा त्यांना देखील आपण मुख्यमंत्री होऊ, याची सूतराम कल्पना नव्हती. शिंदेंच्या बंडामुळं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. पण आता त्यांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं त्यांच्या रुपानं सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवण्याचं वचन पूर्ण झालंय.
एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
धर्मवीर आनंद दिघेंचं बोट धरून १९८० मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात त्यांचं मूळ गाव. ठाण्यातील मंगला हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. ११ वी पास झालेल्या शिंदेंनी पोटापाण्यासाठी ठाण्यात ऑटोरिक्षाही चालवली.
ऐन तरुणवयात आनंद दिघेंच्या संपर्कात शिंदे आले आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. १९८४ मध्ये किसननगरचे शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी हिरीरीनं भाग घेतला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात बेल्लारीच्या तुरुंगात त्यांनी ४० दिवसांचा कारावास भोगला… १९९७ साली ठाणे महापालिकेत ते पहिल्यांदा नगरसेवक झाले… २००१ मध्ये त्यांना ठाणे महापालिका सभागृह नेतेपद देण्यात आलं.





















Join Our Whatsapp Group