पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियांत्रिकी पदांशी संबंधित स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनि:सारण विभागातील अधिकाऱ्यांचे कार्यभार बदलण्यात आले असून आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, महापालिका व स्मार्ट सिटी कार्यक्षेत्रांतर्गत सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प यावर शहर अभियंता मकरंद निकम यांचे नियंत्रण असणार आहे. शिवाय अ,ब,क,इ,फ,ग क्षेत्रीय कार्यालयांच्या स्थापत्य विभागाच्या कामकाजाबाबत शहर अभियंत्यांची प्रथम अंतिम मान्यता घेणे आवश्यक असणार आहे. त्यांची आस्थापना विषयक बाबी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडे असणार आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी स्थापत्य विभागाची जबाबदारी होती.
अ,ब,क,इ,फ,ग क्षेत्रीय कार्यालयांच्या स्थापत्य विभागाची जबाबदारी सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागाच्या कामकाजाकरीता शहर अभियंता यांची प्रथम अंतिम मान्यता घेणे आवश्यक असणार आहे. पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असून त्यांच्या आस्थापना विषयक बाबी पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाकडे असणार आहे. यापूर्वी त्यांच्याकडे स्थापत्य, बी.आर.टी.एस. वाहतूक नियोजन विभागाची जबाबदारी होती.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अधिका-यांकडे सोपविण्यात आलेल्या कार्यभारासंबंधी आदेशाची अंमलबजावणी दि. ६ जुलै २०२२ पासून करण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.