पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नविन शाळा, रुग्णालये, सिटी सेंटर निर्माण करण्यासाठी तसेच विविध नविन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागांतर्गत स्थापत्य प्रकल्प उपविभाग स्थापन करण्यात आला आहे. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशान्वये या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विषयक सर्व कामकाज नियोजित वेळेत व दर्जेदार होण्यासाठी मासिक महापालिका सभेच्या मान्यते अधिन स्थापत्य विभागांतर्गत स्थापत्य प्रकल्प उपविभाग निर्माण करण्यात आल्याची माहिती आयुक्त पाटील यांनी दिली. तसेच या विभागाचे कामकाज सह शहर अभियंता स्थापत्य यांच्याकडे सोपविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ‘सह शहर अभियंता, प्रकल्प’ या पदाचा अतिरिक्त पदभार स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या विभागाच्या कामकाजाकरीता सद्यस्थितीत स्थापत्य बी.आर.टी.एस. विभागामध्ये कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांना कामकाज करण्याचे आदेशही आयुक्त पाटील यांनी दिले आहेत. स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत नव्याने मोठे प्रकल्प सुरु करावयाचे आहेत. बी.आर.टी.एस, महापालिका शाळा, दवाखाने, रुग्णालयांतर्गत असणारे स्थापत्य विषयक सर्व कामकाज या विभागामार्फत करण्यात येणार आहेत. या विभागामार्फत करण्यात येणा-या प्रकल्पांसाठी आवश्यकतेनुसार सल्लागार नियुक्ती करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर शासन मंजूर असलेल्या सह शहर अभियंता स्थापत्य या अभिमानाच्या पदास सोपविलेली कर्तव्य आणि जबाबदा-यांच्या अनुषंगाने सह शहर अभियंता स्थापत्य बी.आर.टी.एस या मंजूर पदाच्या अभिमानाऐवजी सह शहर अभियंता प्रकल्प असे संबोधण्यास महापालिकेची आवश्यकता होती. त्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. या आदेशांची अंमलबजावणी दि ६ जुलै २०२२ पासून करण्यात येत आहे.