हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी संयुक्त करारावर स्वाक्षरी करणारी पहिली शैक्षणिक संस्था ठरली
पुणे (Pclive7.com):- हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्याचे आपले सामाजिक दायित्व जपण्यासाठी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने (एसएसपीयु) एनर्जी स्वराज्य फाउंडेशन बरोबर संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. असे एनर्जी स्वराज्य फाउंडेशन बरोबर करार करणारी एसएसपीयु ही भारतातील पहिलीच युनिव्हर्सिटी ठरली आहे. या समारंभास सिंबायोसिसमधील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या समारंभाची सुरवात डॉ. गौरी शिरूरकर (प्रभारी कुलगुरु, एसएसपीयु) यांच्या स्वागतपर भाषणाने झाली आहे. तसेच डॉ. स्वाती मुजुमदार (प्र- कुलपती सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) यांनी कौशल्य आणि कौशल्यशिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.
डॉ. एस बी मुजुमदार, अध्यक्ष, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी आणि अध्यक्ष (कुलपती, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) यांनी म्हटले आहे की, हवामान बदलासाठी मानवी स्वभाव हे प्रमुख कारण आहे. मानवाने आपल्याला एखाद्या गोष्टीची असणारी गरज आणि त्या गोष्टीबद्दल असणारी हाव यात फरक केला पाहिजे.
एनर्जी स्वराज्य फाउंडेशनचे डॉ. चेतनसिंग सोलंकी द सोलर मॅन ऑफ इंडिया या प्रसंगी म्हणाले की, सध्याची पिढी ही हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी पहिली आणि शेवटची पिढी असणार आहे आणि आपल्याकडे कालावधी खूप कमी उपलब्ध आहे.
सिंबायोसिसने एनर्जी स्वराज फाऊंडेशनसह संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचे आणि मानवी समाजावर हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी योग्य वेळी पाऊल उचलले आहे. याचपद्धतीने इतर विद्यापीठांनी सुद्धा यापद्धतीने पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. चेतनसिंग सोलंकी यांनी केले आहे.
या संयुक्त सामंजस्य करारामध्ये सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि एनर्जी स्वराज फाउंडेशन यांनी जगावरील हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढील उपक्रम राबविण्यास संयुक्तपणे सहमती दर्शवली आहे.
a) ऊर्जा साक्षरता :- वातावरणामध्ये उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साईड आणि इतर कार्बन संयुगांचे प्रमाण (कार्बन फूट प्रिंट) कमी करण्यासाठी समाजामध्ये ऊर्जा साक्षरतेची नितांत गरज आहे. ही आपली संयुक्त जबाबदारी आहे. तसेच अधिक नागरिकांना ऊर्जा साक्षर करण्यासाठी प्रयत्नशील असणे.
b) ऊर्जेचा वापर कमी करणे :- एनर्जी स्वराज फाउंडेशन आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे सौर उर्जेचा वापर १००% आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.
c) ऊर्जा साक्षरतेचे महत्त्व आणि मानवी समाजावर हवामान बदलाचा प्रभाव याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीद्वारे ऊर्जा स्वराज यात्रा आयोजित करणे.
d) सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये एनर्जी स्वराज क्लब हे ऊर्जा वापर कमी करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. तसेच हवामान बदलाच्या परिणामांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करेल.
e) उर्जेचा वापर कमी करण्यासाठी प्रत्येकाला या कार्यक्रमात सहभागी करून घेणे आणि विद्यार्थी, शिक्षकांना एक वर्ग खोली १००% सौरऊर्जेवर सुरू करण्याचे मिशन दिले जाईल.
कार्यक्रमाच्या शेवटी, सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि एनर्जी स्वराज फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे मानवी समाजावरील हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी ऊर्जा साक्षरतेच्या महत्त्वाबद्दल सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.