चिंचवड (प्रतिनिधी):- एकाच खोलीत राहणाऱ्या मित्राने नवीन चप्पल आणली नाही, या किरकोळ कारणावरुन दारूच्या नशेत मित्राचाच खून केल्याचा प्रकार चिंचवड पोलीस पोलीसांनी उघडकीस आणला आहे. चिंचवडमधील केशवनगर येथे २४ सप्टेंबरला एका कामगाराचा मृतदेह आढळला होता. आरोपीने मयत इसमाला नवीन चप्पल आणण्यासाठी सांगितले होते. त्याने चप्पल आणली नसल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत आरोपीने डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता. चिंचवड पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरला चिंचवडच्या केशवनगर येथील खुशबू हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका इसमाचा मृतदेह आढळला होता. तो खून असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. राम सनेही जगदीश रावत असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव होते. मयत राम सनेही जगदीश रावत आणि दत्ता मच्छीवाला हे एका खोलीत राहत होते, हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. दत्ता मच्छीवाला याने मयत राम सनेही जगदीश रावत याला नवीन चप्पल आणण्यासाठी सांगितले होते. परंतु त्याने चप्पल आणली नाही म्हणून आरोपी आणि मयत यांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातूनच दत्ता याने राम सनेहीच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते. आपल्या हातून खून झाल्याचे लक्ष्यात येताच आरोपी उत्तरप्रदेशला पळून गेला होता.
दरम्यान, चिंचवडचे पोलीस निरीक्षक व्ही.के कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. अखेर आरोपीला उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.