पिंपरी (प्रतिनिधी):- अहिंसेच्या आणि सत्याच्या मार्गाने जीवनात यशस्वी होता येते. हे महात्मा गांधींनी स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले. त्यांनी दाखवून दिलेला अहिंसेचा मार्ग आणि सर्व धर्म समभाव हे तत्वज्ञान दूर्लक्षित करुन त्यांची प्रतिमा आणि त्यांचा चष्मा स्वत:च्या ब्रॅन्डींगसाठी मोदी सरकार वापरत आहे. तसेच दिवगंत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान – जय किसान’च्या ना-याची गरज आजही देशाला आहे. देशातील सैनिक आणि शेतकरी यांचा विकास व्हावा म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी धोरणे आखली. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पिंपरी संत तुकारामनगर येथील शहर काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात साठे बोलत होते. यावेळी महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला प्रदेश सरचिटणीस बिंदू तिवारी, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, ॲड. क्षितिज गायकवाड, युवा शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवक अध्यक्ष मयुर जैयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, सज्जी वर्की, सतिश भोसले, परशूराम गुंजाळ, तानाजी काटे, वसंत मोरे आदी उपस्थित होते.
सचिन साठे पुढे म्हणाले की, राज्यात निवडणूकी आदी शेकडो सभा आणि दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील तीन वर्षांत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांचे अश्रू पूसण्यासाठी एकदाही आले नाही. या सरकारच्या कार्यकाळात देशभर अल्पसंख्यांक व दलितांवर हल्ले वाढले आहेत. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचे पाईक असणा-या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरच देशाचे सार्वंभौमत्व आणि अखंडतत्व अबाधित राखण्याची जबाबदारी आली आहे. पुढील काळात काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही असेही प्रतिपादन सचिन साठे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबईतील रेल्वे उड्डाणपूल दुर्घटनेत मुत्यू पावलेले नागरिक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. विठ्ठल देवकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वागत संग्राम तावडे, सुत्रसंचालन मयूर जैयस्वाल, तर आभार नरेंद्र बनसोडे यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group