पिंपरी (प्रतिनिधी):- दुर्मिळ व रागीट जातीचा वॉल्स सिंध नावाचा विषारी साप पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात आढळला आहे. हा साप महाराष्ट्रात क्वचित ठिकाणी आढळतो. हा साप पुणे व पिंपरी चिंचवड तसेच कात्रज येथे देखील यापूर्वी आढळला होता. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा त्याचे दर्शन झाले आहे.
वॉल्स सिंध मण्यार जातीचा हा साप रात्री पिंपळे सौदागर येथील चौकाच्या कडेला आढळून आल्यानंतर नागरिकांनी भोसरीतील सर्प मित्र राजू कदम यांना दूरध्वनी केला. वॉल्स जातीचा हा साप १९९६ मध्ये प्रथम आढळला होता. मूळचा पाकिस्तानातील सिंध प्रांतात हा साप आढळतो. या सापाची लांबी ५ फूटपेक्षा जास्त (१५२ से.मी.) आहे. गडद व काळ्या तपकिरी रंगाचा दिसणारा हा विषारी साप पांढरे-आडवे पट्टे असलेला आहे. त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वॉल्स सिंध जातीचा हा साप डोक्याकडे जाड आणि शेपटीचा रंग गडद असा आहे. या सापाचे शरीर दंडगोलाकार आहे. डोळा व नाकपुडीच्या खाली व तोंडाच्या मधील भागात पिवळसर रंग दिसणाऱ्या या सापाचे खाद्य पांढरे उंदीर व पाली आहे. सोलापूर, वर्धा, उत्तर प्रदेश, बिहार, भात शेती, ओसाड प्रदेश तसेच पडक्या घरात आढळतो. चित्र-विचित्र षट्कोनी खवले असा साप दिसल्यावर नागरिकांची घाबरगुंडी उडाल्याशिवाय राहत नाही. रागीट समजला जाणारा हा साप विषारी आहे, अशी माहिती सर्प मित्र राजू कदम यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group