थेरगावमध्ये मायाताई संतोष बारणे आयोजित ‘संवाद सोसायटी धारकांशी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- कचऱ्याचा प्रश्न, बिल्डरांकडून फसवणूक, वीज समस्या, प्रशासकीय कामकाजातील अडचणी अशा अनेक समस्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारक त्रस्त आहेत. लवकरच महापालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. शब्द देतो.. लवकरच शहरातील सोसायटी धारकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी दिले.

थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे माजी नगरसेविका मायाताई बारणे व माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांच्या संकल्पनेतून संवाद सोसायटी धारकांशी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोसायटी धारकांनी थेट अजितदादा पवार यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, अजित प्रतिष्ठानचे अभय मांढरे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी चिंचवड विधानसभेसह शहरातील अनेक सोसायटी धारक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी काही प्रमुख सोसायट्यांच्या समस्या अजितदादांच्या पुढे मांडण्यात आल्या. त्यामध्ये थेरगाव येथील अक्षय पार्क, रिदम हौसिंग सोसायटी, पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या वतीने अजितदादांना तक्रारींचे निवेदन देण्यात आले.
उपस्थित सोसायटी धारकांचे म्हणणे ऐंकल्यानंतर अजितदादा पवार म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून या शहराचे अन् माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे या शहरात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करू शकलो. येथील नागरिकाला प्रत्येक मूलभूत सुविधा देण्यावर आमचा भर राहिला आहे. मात्र शहराचा सर्वांगीण विकास करूनही पाच वर्षांपूर्वी नागरिकांनी राष्ट्रवादीला नाकारले.
गेल्या काही वर्षात शहरात नागरिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड, रावेत यासह मोशी परिसरात मोठ्या संख्येने गृहप्रकल्पांची उभारणी होत आहे. आज मायाताई बारणे यांनी सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. येथील सोसायटी धारकांच्या समस्या मी ऐकल्या, सोसायटी धारक टॅक्स भरतो, नोंदणी शुल्क देतो. त्यांचा पैसा महापालिकेच्या तिजोरीत जातो. त्यामुळे महापालिकेने येथील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्याच पाहिजेत.
लवकरच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महावितरण व संबंधित विभागाशी निगडित असलेल्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने या समस्यांचा पाठपुरावा देखील केला जाईल. तुम्हाला शब्द देतो.. लवकरच या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे शेवटी बोलताना ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका मायाताई बारणे यांनी केले. तर आभार संतोष बारणे यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group