पिंपरी (Pclive7.com):- भाजयुमोच्या फेरबदलात पिंपरी-चिंचवडला मानाचे पान मिळाले आहे. मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय येथे भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस पदी व युवा वॉरियर्स प्रदेश संयोजक पदी निवड अनुप मोरे यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची तोंडावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन भाजपने पिंपरी महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी जोरात प्रयत्न सुरु केले आहेत. त्याची तयारी म्हणून शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रदेशवर संधी दिली जात आहे. त्यातही मूळ आणि एकनिष्ठांना आवर्जून प्राधान्याने ती देण्यात येत आहे.
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना पक्षाने नुकतेच विधान परिषदेवर आमदार केले. त्याअगोदर पक्षाचे पिंपरी पालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना प्रदेश प्रवक्तेपदी बढती दिली. तर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजपचा आणखी एक तरुण चेहरा अमित गोरखे यांना पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून नियुक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची तयारी पुढे चालू ठेवताना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांना भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस तसेच पक्षाच्या युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक म्हणून आज बढती पक्षाने दिली. ते शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे चिरंजीव आहेत. पक्षाने दाखविलेला हा विश्वास सार्थ ठरवेल, अशी प्रतिक्रिया अनुप मोरे यांनी दिली आहे. राज्यातील युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त युवा वॉरियर्सच्या शाखा राज्यात उघडून युवकांना युवा मोर्चात सहभागी करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे ते म्हणाले.






















Join Our Whatsapp Group