पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या जनसंवाद सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी वाकड प्रभाग क्रमांक ३८ जुना प्रभाग २५ येथील समस्यांचा पाढा वाचला. तसेच अर्धवट विकासकामे त्वरित पूर्ण करा अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात नेहमीप्रमाणे सोमवारी जनसंवाद सभा पार पडली. यावेळी मुख्य समन्वयक अधिकारी यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या. विशाल वाकडकर यांनी वाकड येथील भूमकर चौक, भूमकर वस्ती, वाकडकर वस्ती, भुजबळ वस्ती, डी.पी.रोड वाकड, काळाखडक येथील महापालिकेच्या वतीने सुरु असलेली कामे आणि त्याबाबत होत असलेली दिरंगाई आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास याबाबत विचारणा केली.
चिंधाजी भूमकर चौक ते भुजबळ वस्ती हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रुंदीकरणाअभावी तसाच अरुंद आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी उघड्या गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केमसे वस्ती ते भुजबळ वस्ती भागांत ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची संख्या वाढली आहे. तिथे डेंग्यू प्रतिबंध धूर फवारणी करण्यात यावी. कस्तुरी चौक ते पेट्रोल पंप या डिपी रोडच्या बाजूला ओपन जिम उभारण्यात यावी.
भूमकर चौकातील सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर डांगे चौक किंवा भक्ती शक्ती येथील उड्डाण पुलाच्या धर्तीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा. तेथील सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक तसेच आय टी पार्क हिंजवडी येथील नोकरवर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. रॉयल एट्राडा सोसायटी समोरील रस्त्याच्या पदपथाचे अर्धवट काम पूर्ण करण्यात यावेअशा अनेक समस्यांबाबत विशाल वाकडकर यांच्याकडून जनसंवाद सभेत विचारणा करण्यात आली.
Tags: जनसंवाद सभानागरिकांच्या तक्रारीनागरिकांच्या समस्यापिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसभूमकर चौकवाकडविशाल वाकडकर