पिंपरी (Pclive7.com):- मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट व्हॉट्स अॅपवर उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांचा व्हॉट्स अॅपचा वाढता वापर पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभी राहावे लागणार नाही. तसेच वेळेची देखील बचत होणार असल्याची माहिती मेट्रोच्या वतीने देण्यात आली आहे.

पुणे मेट्रोने ९४२०१०१९९० हा व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू केला असून प्रवाशांनी आपल्या मोबाइलमध्ये हा नंबर सेव्ह करून ठेवण्याचे आवाहन मेट्रोने केले आहे. प्रवासी पुणे मेट्रोच्या या फोन नंबर वर हाय मेसेज पाठवून चॅटबॉटशी संवाद साधण्यासाठी किंवा कोणत्याही मेट्रो स्टेशनवर उपलब्ध क्युआर कोड स्कॅन करून व्हॉट्सअॅप चॅट सुरू करू शकतात.
सध्या व्हॉट्सअॅपद्वारे क्युआर कोड ई-तिकीट टॉम काउंटर आणि डिजिटल किओस्क मशीनद्वारे वितरित केले जाते. लवकरच प्रवासी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे तिकिटे बुक करू शकतील आणि व्हॉट्स अॅप वापरकर्ते त्यांच्या तिकिटांसाठी पेमेंट करू शकतील. व्हॉट्स अॅपवर त्यांचा प्रवास तपशील निवडल्यानंतर एकात्मिक पेमेंट पार्टनरद्वारे रिचार्ज करू शकतील. ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असणार, अशी माहिती मेट्रोने सांगितले.
या बाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, पुणे मेट्रोच्या नवीन व्हॉट्स अॅप चॅटबॉट सुविधेमुळे प्रवाशांना सुलभ आणि त्रासमुक्त प्रवास उपलब्ध होणार आहे. ही नवीन तिकीट प्रणाली नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी खूप मदत करेल आणि हे एक पर्यावरणास अनुकूल पेपरलेस तिकीट आहे. पुणे मेट्रो पुण्यातील नागरिकांना आणि अभ्यागतांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यावर विश्वास ठेवते. पुणे मेट्रोने लोकांना व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा वापरण्याचे आवाहन केले आहे.





















Join Our Whatsapp Group